(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीतील सुवर्णकन्या स्वरा विकास साखळकर हिने आपल्या दमदार कामगिरीने जिल्हा आणि विभागीय दोन्ही पातळ्यांवर सुवर्णपदक पटकावत रत्नागिरीची मान उंचावली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा 2025-26 SVJTC क्रीडा संकुल, डेरवण-सावर्डे येथे 9 आणि 10 रोजी पार पडल्या.
या स्पर्धेत SRK तायक्वांदो क्लबची खेळाडू स्वरा साखळकर हिने क्युरोगी प्रकारात अंडर-38 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीच्या जोरावर तिची विभागीय स्पर्धेसाठी (कोल्हापूर) निवड झाली.
रत्नागिरी जिंकलं… आणि कोल्हापूर गाजवलं!
विभागीय स्तरावर झालेल्या शालेय तायक्वांदो स्पर्धेत (14 वर्षाखालील 38 किलो गटात) स्वराने पुन्हा सुवर्ण पदक पटकावले. या दुहेरी विजयामुळे तिची आता शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर येथे निवड झाली आहे.
स्वराला या दोन्ही स्पर्धांमध्ये SRK तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कोचिंगने विभागीय स्तरावर लक्ष वेधून घेतले.
स्वरा ही इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी असून ती रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र. 15 दामले विद्यालयात शिकत आहे. तिच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप, तालुका समन्वयक विनोद मयेकर, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, प्रशिक्षक मिलिंद भागवत, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व क्लब पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
सर्वांनी तिच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या असून, तिच्याकडून आणखी सुवर्णपदकाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

