(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हिंदू कॉलनी परिसरात गुरुवारी सकाळी घडलेल्या धाडसी प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्ता विचारण्याचा बहाणा करत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी एका युवकाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून क्षणार्धात पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कांचन जैन (रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) हे गुरुवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास हिंदू कॉलनी परिसरात उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या निमित्ताने थांबवले. संवाद सुरू असतानाच मागे बसलेल्या तरुणाने अचानक झडप घालत जैन यांच्या गळ्यातील सुमारे सहा ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. घटनेनंतर आरोपींनी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून वेगाने घटनास्थळावरून पळ काढला. दिवसाढवळ्या आणि वर्दळीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले आहे. प्राथमिक तपासात आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या वर्णनानुसार, दोन्ही आरोपी सडपातळ बांध्याचे तरुण असून ते मराठीत संवाद साधत होते. यापैकी एकाने तोंडावर रुमाल बांधला होता, तर दुसरा उंचीने अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
भरवस्तीत अशा प्रकारे घडलेल्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास शहर पोलिसांकडून सुरू आहे.

