( देवरुख )
आंबा घाट परिसरात बुधवारी रात्री लुटीची धक्कादायक घटना घडली. बांबावडेकडे बोलेरोमधून म्हैस घेऊन जाणाऱ्या चालकाला दख्खनजवळ अडवून ८ जणांच्या टोळीने त्याच्याकडील सुमारे २५ हजार रुपये लुटले असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा छडा लावला. या कारवाईत ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित ३ आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, पोलीस हवालदार सचिन कामेरकर आणि प्रशांत साळुंखे यांनीही या कारवाईत सहभाग घेतला.
घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची पाहणी केली. फरार आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

