(मुंबई)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र, ईकेवायसी (EKYC) करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून, महिला मोबाईलवरून स्वतः ईकेवायसी (EKYC) करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ईकेवायसी (EKYC) च्या बहाण्याने लाभार्थी महिलांकडून गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यानुसार दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
“ईकेवायसी (EKYC) करून देतो” असे सांगून काहीजण महिलांची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये तसेच खोट्या भूलथापांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
2.21 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार
राज्यातील महिला व बालविकास विभागात तब्बल 2 लाख 21 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. महिला व बाल विकास विभागात तब्बल 23 वर्षांनंतर 8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
महिला व बाल विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध 11 मार्च 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला होता. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सन 2003 नंतर, म्हणजेच तब्बल 23 वर्षांनंतर विभागाच्या रचनेत हा मोठा बदल करण्यात आला असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे विभागाच्या कामकाजास मोठी गती मिळणार आहे.
विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित (रद्द) करून 165 नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण 8 हजार 669 नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी 2 हजार 843 पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत 1 लाख 10 हजार 664 अंगणवाडी सेविका तसेच 1,10,664 अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण 2 लाख 21 हजार 328 मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, 23 वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल. विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांतील गट अ ते गट ड मधील एकूण 8669 नियमित पदे, 2843 बाह्यस्त्रोत पदे तसेच, 1,10,664 अंगणवाडी सेविका आणि 1,10,664 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 221328 मानधनी पदांना मान्यता दिली आहे.

