(रत्नागिरी)
जिल्ह्यातील सरकारी तसेच खाजगी रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा साठा अत्यंत कमी झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध साठा केवळ काही दिवसांपुरताच पुरेल, अशी स्थिती असून आपत्कालीन रुग्ण व शस्त्रक्रियांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभाग प्रमुख श्री. मयुरेश्वर पाटील यांनी नागरिकांना तातडीने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवत असून, वेळेवर रक्त न मिळाल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
याबाबत बोलताना श्री. पाटील म्हणाले, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सध्या जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये साठा अत्यल्प आहे. रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाचे उपचार थांबू नयेत, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे येऊन जवळच्या रक्तपेढीत रक्तदान करावे.”
तसेच, विविध सामाजिक संस्था, मंडळे आणि तरुणांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे. या संकटकाळात समाजाने एकजुटीने पुढे येत गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी योगदान देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

