(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील जागृत ग्रामदेवता श्री जाकादेवी यांच्या देवदिवाळी निमित्त एक दिवसीय जत्रा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडली. हजारो भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
देवदिवाळीनिमित्त मंदिरात श्री जाकादेवी, जुगादेवी आणि मानूबाय या देवींना पारंपारिक पद्धतीने मुखवटे लावण्यात आले. देवतांची पूजा, आरती आणि विविध धार्मिक विधी सर्व भक्तगणांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिभावाने पार पडले.
गावखडीतील श्री जाकादेवी नवसाला पावणारी आणि संकटसमयी हाकेला धावणारी जागृत देवी म्हणून ख्याती आहे. त्यामुळे देवदिवाळीच्या जत्रेसाठी आज हजारो भाविकांची उपस्थिती जाणवली. विशेषत: देवीची ओटी भरण्यासाठी मुंबई, पुणे तसेच रत्नागिरी परिसरातील अनेक सुवासिनी महिलांनी मोठ्या संख्येने भेट दिली.
(छायाचित्र : दिनेश पेटकर, गावखडी)

