(नवी दिल्ली)
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या महामार्गांवरील अपघात कमी करण्याच्या मोहिमेला गती देत NHAI मोठे पाऊल उचलत आहे. राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोबाईलवर थेट अपघातपूर्व चेतावणी प्रणाली सुरू केली जात आहे. या उपक्रमामुळे महामार्गावर पुढे दाट धुके, तीव्र वळण (ब्लाइंड स्पॉट), किंवा अपघातप्रवण क्षेत्र असल्याची माहिती चालकांना आधीच एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार आहे. यामुळे चालकांना वेग नियंत्रित करता येईल आणि संभाव्य अपघात टाळता येतील.
मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 4–5 महामार्गांवर सध्या हा पायलट प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये दिल्ली, चंदीगड, पंजाब, हरियाणा आणि ओडिशातील काही महामार्गांचा समावेश असू शकतो. हा पायलट प्रकल्प पुढील एका महिन्यात सुरू होईल. यानंतर देशभरात प्रत्येक राज्यात महत्वाच्या महामार्गावर लागू केला जाईल.
सोमवारी NHAI ने या प्रकल्पासाठी रिलायन्स जिओसोबत भागीदारी केली आहे. सुरुवातीला जिओचे 4G आणि 5G नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना ही चेतावणी मिळेल. नंतर एअरटेल आणि इतर मोबाईल कंपन्यांचे वापरकर्तेही या सुविधेशी जोडले जातील. सध्या ही प्रणाली एसएमएस अलर्ट देईल; भविष्यात व्हॉइस मेसेजेसदेखील सुरू केले जाणार आहेत. व्हॉइस अलर्टमुळे चालकांना रस्त्यावरील परिस्थितीची माहिती हातातील फोन न पाहताच मिळेल, ज्यामुळे सुरक्षा आणखी वाढणार आहे.
NHAI यांच्या माहितीनुसार, या संदेशांद्वारे चालकांना प्रत्येक 1–2 किलोमीटरवर पुढील परिस्थितीची माहिती दिली जाईल. यामध्ये तीव्र वळण, दाट धुके, जास्त प्रमाणात प्राण्यांची वर्दळ, अपघातप्रवण क्षेत्र यांचा समावेश आहे. भविष्यात महामार्गांवरील हाय-अॅक्सिडेंट झोन ओळखून तिथे इशारा फलक (होडिंग्स) उभारण्याचीही तयारी आहे.
ही चेतावणी प्रणाली NHAI च्या डिजिटल प्लॅटफॉर्म्स, हायवे यात्रा मोबाइल अॅप आणि आपत्कालीन हेल्पलाइन 1033 शी देखील जोडली जाणार आहे, ज्यामुळे महामार्गावरील आपत्कालीन सेवा आणखी सक्षम होणार आहेत.

