(मुंबई)
राज्यात आधार आणि यूडायस प्लस या शैक्षणिक नोंदणी प्रणालीतील गंभीर त्रुटींमुळे हजारो विद्यार्थी सरकारी रेकॉर्डमध्ये दिसेनासे झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या तांत्रिक घोळाचा सर्वाधिक फटका मराठी शाळांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण, यूडायस प्लसच्या आकडेवारीत विद्यार्थ्यांची संख्या कमी दाखवली गेल्यास शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
अनेक शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्गात नियमित उपस्थित असलेले विद्यार्थी कागदोपत्री नोंदले जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी शिक्षकांची पदे कमी केली जात आहेत, काही ठिकाणी वर्ग बंद केले जात आहेत, तर काही शाळांना थेट टाळे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यूडायस प्लस 2023–24 च्या राष्ट्रीय अहवालानुसार महाराष्ट्रात सुमारे 97.7 टक्के विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक यूडायस प्लस प्रणालीत दिला आहे. मात्र, महाराष्ट्र यूडायस प्लस पोर्टलवरील 2025 पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीत वेगळेच चित्र समोर येत आहे.
यूडायस प्लस नोंदणीकृत विद्यार्थ्यांची सद्यस्थिती:
- एकूण नोंदणीकृत विद्यार्थी: 2,14,68,288
- आधार माहिती सबमिट केलेले: 2,09,69,529
- यातील वैध (Verified) आधार: 2,03,21,408
- अवैध आधार: 5,78,433
- आधार न दिलेले विद्यार्थी: 4,98,759
- तपासणी प्रक्रियेत असलेले: 69,688
यूडायस प्लस प्रणालीमध्ये आधार पडताळणी सक्तीची केल्याने अनेक विद्यार्थ्यांची नोंद ‘इनव्हॅलिड’, ‘नॉट प्रोव्हायडेड’ किंवा ‘अंडर व्हेरिफिकेशन’ या श्रेणीत अडकली आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असतानाही सरकारी रेकॉर्डमध्ये शाळेबाहेर दाखवले जात आहेत. या विद्यार्थ्यांना ‘आऊट ऑफ स्कूल’ म्हणून वर्गीकृत होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या गोंधळाचा थेट परिणाम शाळांच्या विद्यार्थीसंख्येवर होत असून शिक्षक भरती, अनुदान, मध्यान्ह भोजन योजना, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक सुविधांवर त्याचा विपरीत परिणाम दिसू लागला आहे. शैक्षणिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून आधार–यूडायस प्लस प्रणालीतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी शिक्षक संघटना आणि शिक्षणतज्ज्ञांकडून होत आहे.

