(चिपळूण)
चिपळूण नगरपरिषदेतील मालमत्ता विभागातील वरिष्ठ लिपिक अनिल संभाजी राजेशिर्के यांचे आज बुधवारी सकाळी 11 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते अत्यंत सेवाभावी आणि प्रामाणिक वृत्तीचे अधिकारी होते. अनेक वर्षे त्यांनी नगरपरिषदेतील विविध जबाबदाऱ्या पार पाडत प्रामाणिकपणे कार्य केले आणि सहकाऱ्यांमध्ये व वरिष्ठांमध्ये अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.
राजेशिर्के हे गेले काही महिने आजारी होते. त्यांच्या निधनामुळे नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक समाजात दुःखाचं वातावरण पसरलं आहे. त्यांच्या कर्तृत्व, समर्पण आणि सर्वांशी नम्रतेने वागण्याची वृत्ती अनेकांना प्रेरणादायी ठरली आहे.
त्यांचे अंत्यसंस्कार सायंकाळी रामतीर्थ स्मशानभूमीवर पार पडले. अंत्ययात्रेमध्ये माजी आमदार रमेशभाई कदम, रामदास राणे, लियाकत शाह यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना अखेरचा आदरांजली अर्पण केली. अनिल राजेशिर्के यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक बहिण असा कुटुंब आहे.

