(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील माडबन–विजयदुर्ग ते नाटे दरम्यान शनिवारी रात्री समुद्रात ऐकू आलेल्या स्फोटासारख्या आवाजांमुळे निर्माण झालेल्या भीतीचे रविवारी निरसन झाले. खोल समुद्रातून मार्गक्रमण करणाऱ्या टग (मोठ्या बोटी)वरून सिग्नल पिस्टलद्वारे करण्यात आलेल्या फायरिंगमुळे हे आवाज निर्माण झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. त्यामुळे ‘मिसाईल फायर’च्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
व्हिडीओ पाहा: खोल समुद्रातील प्रकारावर प्रशासनाचा खुलासा, SP नितीन बगाटे यांनी काय सांगितलं?
शनिवारी रात्री सुमारे ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास माडबन व विजयदुर्ग किनारपट्टीपासून अंदाजे २० नॉटिकल मैलांवरून सलग काही मोठे आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या काही मच्छीमारांनी हे आवाज ‘मिसाईल फायर’चे असल्याचा समज करून घेतल्याने ही माहिती वेगाने पसरली. परिणामी किनारपट्टीवरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने तातडीने हालचाल केली. संबंधित समुद्री पट्ट्यात ड्रोनच्या साहाय्याने पाहणी करण्यात आली. दरम्यान, कोस्टगार्डच्या नौकांनीही त्या परिसरात गस्त वाढवली. मुंबईहून इंटरसेप्टर नौकाही तत्काळ रवाना करण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणांच्या या समन्वित कारवाईमुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले.
नक्की पाहा व्हिडीओ: उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यात तीस दिवसांपासून आंदोलन सुरूच, प्रशासन लक्ष देईना
रविवारी सकाळी कोस्टगार्डकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, संबंधित वेळी खोल समुद्रातून एक टग मार्गक्रमण करत होता. त्या टगवरून ३ ते ४ वेळा सिग्नल पिस्टल फायर करण्यात आले. समुद्रातील नियमित संकेतवहनाचा हा भाग असला तरी मोठ्या आवाजांमुळे मच्छीमारांमध्ये गैरसमज निर्माण झाला आणि त्यातून अफवा पसरली. कोणत्याही अपप्रचारावर किंवा अपुष्ट माहितींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना केले आहे.

