(सातारा)
साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालय येथे मृतदेहांच्या अदलाबदलीचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याचबरोबर, अर्भक मृत्यू प्रकरणी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू आहे.
मृतदेहांची अदलाबदल; नातेवाईकांचा संताप
वाई तालुक्यातील सोनगिरवाडी येथील नागरिक मृतदेह घेऊन गेल्यानंतर तो दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मृतदेह परत रुग्णालयात आणला. या घटनेमुळे मंगळवारी रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. धक्कादायक बाब म्हणजे, आरळे गावातील नातेवाईकांनी चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही सुरू केले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच संपर्क साधल्याने पेटती चिता विझवावी लागली. या प्रकरणाची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर कर्मचारी शंकर शिंदे आणि विशाल रावखंडे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले.
आनंद ओव्हाळ (वय 26, सोनगिरवाडी, ता. वाई), सुरेश खोमणे (वय 51, आरळे, ता. सातारा) दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांना मृतदेह देताना चेहरे न दाखवता ताब्यात देण्यात आल्याने गोंधळ झाला आणि अदलाबदल उघडकीस आली.
एका महिन्यात दुसऱ्यांदा प्रकार
या रुग्णालयात ५ मार्चलाही मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा प्रकार समोर आला होता. एका महिन्यात दोनदा अशा घटना घडल्याने रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अर्भक मृत्यू प्रकरणही चर्चेत
विजापूर (कर्नाटक) येथील अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रसूतीनंतर योग्य काळजी न घेतल्याने अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात पोहोचले असून, त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी सुरू आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सचिव ई. रावेंद्रन, संचालक डॉ. नितीन आंबेडकर आणि अन्य अधिकाऱ्यांची समिती नेमून सखोल चौकशी केली. या अहवालाच्या आधारेच संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या सर्व प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधित कर्मचाऱ्यांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली होती. सलग घडलेल्या घटनांमुळे सातारा जिल्हा रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला असून, आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणाचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणातील चौकशी अहवाल आणि पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

