(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
इचलकरंजी येथे नुकत्याच पार पडलेल्या १५ व्या राज्यस्तरीय शैक्षणिक स्पर्धेत कसबा येथील कु. विवान धनाजी भांगे याने दैदिप्यमान यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि परिश्रमाच्या जोरावर विवानने राज्यपातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत शाळा, कुटुंब आणि परिसराचे नाव उज्ज्वल केले.
या स्पर्धेत विवानने प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘चॅम्पियन’ किताब पटकावला. प्रश्नमंजुषा, बौद्धिक चाचण्या आणि स्मरणशक्तीवर आधारित विविध स्पर्धांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत आपली वेगळी छाप निर्माण केली. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत विवानने रौप्य पदक मिळवले. वेग, अचूकता आणि स्मरणशक्ती यांचा कस लागणाऱ्या या परीक्षेत मिळवलेले यश विशेष मानले जात आहे.
तसेच राज्यस्तरीय ‘मंथन’ सामान्य ज्ञान परीक्षेत विवानने ९० टक्के गुण मिळवत आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला. त्याच्या या यशातून सामान्य ज्ञान, तर्कशक्ती आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांचा उत्कृष्ट संगम दिसून येतो.
विवान हा न्यू इंग्लिश स्कूल, कसबा येथील विद्यार्थी असून त्याच्या यशामागे शाळेतील शिक्षकवृंदासह सौ. अत्तार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्याचे वडील श्री. धनाजी भांगे यांनी दिलेले प्रोत्साहन आणि मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे ठरले.
एकाच वेळी विविध तीन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवल्याने विवानचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

