( मुंबई )
कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासादरम्यान मोठा ट्विस्ट समोर आला आहे. मुख्य संशयित अशोक खरात आणि त्याचा माजी कर्मचारी नीरज जाधव यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असता, खरातने केलेल्या दाव्यामुळे प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, नीरज जाधव हा खरातच्या कार्यालयात ‘ऑफिस बॉय’ म्हणून काम करत होता. चौकशीदरम्यान खरातने दावा केला की, “नीरज जाधवला कोणीतरी पूर्वनियोजित कट रचून माझ्याकडे पाठवले होते. तो स्वतःहून नोकरीसाठी आलेला नव्हता.” या विधानामुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नीरज जाधव हा एका वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून कमी पगारावर नोकरीस लागला होता. 2019 ते 2024 या कालावधीत तो खरातकडे कार्यरत होता. मात्र आता त्याच्यावरच संशय व्यक्त केल्याने या प्रकरणामागे तिसरी व्यक्ती किंवा गट कार्यरत आहे का, याचा शोध घेणे तपास यंत्रणांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ने खरातचा दावा फेटाळून लावला आहे. तपासाची दिशा भरकटवण्यासाठीच हा बनाव करण्यात आला असावा, असा संशय अंनिसने व्यक्त केला आहे. अंनिसने आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत, “नीरज जाधवपूर्वी काम करणाऱ्या 10 ऑफिस बॉयनी नोकरी का सोडली?” असा सवाल उपस्थित केला आहे. या सर्व माजी कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणीही समितीकडून करण्यात आली आहे.
तीन विभागांना पाठवली पत्र
एसआयटीकडून तीन महत्त्वाच्या सरकारी विभागांना पत्र पाठवण्यात आले असून तपासाला नवे वळण मिळाले आहे. अशोक खरात यांच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि परदेश प्रवासाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. माहितीनुसार, आयकर विभाग, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग आणि पासपोर्ट विभाग यांना अधिकृत पत्रे पाठवण्यात आली आहेत. खरात यांच्या स्थावर मालमत्तेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाकडे चौकशी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील जाणून घेण्यासाठी आयकर विभागाकडून माहिती मागवण्यात आली आहे.
याशिवाय, परदेश दौरे आणि प्रवासाचा इतिहास तपासण्यासाठी पासपोर्ट विभागालाही पत्र पाठवण्यात आले आहे. एसआयटीने या तिन्ही विभागांकडून अधिकृतरीत्या माहिती मागवली असून, या माहितीच्या आधारे तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
३०० अश्लील व्हिडिओ जप्त
अहवालानुसार, भोंदुबाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ २०२४ सालातील आहेत. हे व्हिडिओ दोन ते तीन महिन्यांच्या विशिष्ट कालावधीत रेकॉर्ड केले गेले असण्याची शक्यता आहे. तपासात असेही उघड झाले की, ओकची मालमत्ता हे खरातच्या सर्व अवैध कारवायांचे केंद्र होते. शिवाय, अहवालानुसार एसआयटीने अशोक खरात यांच्याशी संबंधित ३०० हून अधिक व्हिडिओ यशस्वीरित्या जप्त केले आहेत.

