(मदुराई /चेन्नई)
अवघ्या १० दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मदुराई शहरातील कालावासल बायपास रोडवरील तनिष्क ज्वेलरी शोरूममध्ये मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी शोरूममधील काचेच्या डिस्प्ले केसेस फोडून सुमारे १६ किलो दागिने चोरून नेले. या दागिन्यांची अंदाजे किंमत २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.
१० नोव्हेंबर रोजी शोरूमचे कर्मचारी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचारी शोरूममध्ये आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच एस.एस. कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला असून शोरूममधील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली आहे. मदुराई शहर पोलीस आयुक्त राजेंद्रन, उपायुक्त इनिगो दिव्यान आणि वनिता यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात चोरट्यांनी इमारतीच्या मागील बाजूस बांधकामासाठी उभारलेल्या लोखंडी स्कॅफोल्डिंगचा वापर करून वरच्या मजल्यावर प्रवेश केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या; मात्र अद्याप कार्यान्वित नसलेल्या शाफ्टमधून ते थेट शोरूममध्ये उतरले. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास तोंडावर मुखवटे घातलेल्या चोरट्यांनी दागिने ठेवलेल्या भागातील अंतर्गत भिंती आणि दरवाजे तोडून सोन्याचे दागिने लंपास केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीच्या वेळी शोरूममध्ये एकूण ४८ किलो दागिने होते. त्यापैकी शेल्फवर ठेवलेल्या दागिन्यांमधील सुमारे ३० टक्के दागिने चोरट्यांनी पळविल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त राजेंद्रन यांनी सांगितले की, तीन व्यक्तींनी शोरूमच्या मागील दरवाजा आणि भिंत तोडून आत प्रवेश केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांचे अचूक वजन आणि मूल्य निश्चित करण्यासाठी चौकशी सुरू आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुखवटा आणि हातमोजे घातलेली एक व्यक्ती ट्रॉली बॅग घेऊन जाताना दिसत आहे. या दृश्यांच्या आधारे चोरीत सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. संशयित शोरूमपर्यंत कोणत्या मार्गाने पोहोचले, ते कुठून आले आणि चोरीनंतर कोणत्या दिशेने पसार झाले, याचा शोध घेण्यासाठी परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
संशयितांची देहबोली आणि चालण्याची पद्धत यांची इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील दृश्यांशी तुलना केली जात आहे. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रॉली बॅगचा आकार, रंग, स्वरूप आणि चाकांची रचना यांचाही तपास केला जात आहे. विशेषतः काळ्या रंगाच्या बॅगेच्या वैशिष्ट्यांवर पोलिसांचे लक्ष आहे. शोरूमचे बांधकाम अपूर्ण असणे आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी यामुळे चोरट्यांना चोरी करणे शक्य झाल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी अधिक तीव्र केली असून संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे काम सुरू ठेवले आहे.


