(चिपळूण)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात ६ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या हाणामारी प्रकरणात १० संशयितांवर गुन्हा दाखल झाला. या घटनेशी संबंध नसलेल्या ३ तरुणांना नाहक अडकवण्यात आले आहे. यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज देऊनही पोलिसांनी कार्यवाही केलेली नाही. मुख्य संशयित आरोपींना ५५ दिवसांत अटक झालेली नाही.
मात्र सहभाग नसलेल्या मुलांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे या तिन्ही मुलांच्या पालकांनी विविध सेवाभावी संस्थांसह ५ फेबुवारीपासून उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शाहनवाज शाह व संशयित आरोपींचे पालक म्हणाले की, परशुराम घाटात झालेल्या मारहाण प्रकरणात १० संशयित आरोपींमध्ये निहाल सईद अलवारे, शहबाज सिद्धीक दळवी, मुझफ्फर इनामदार यांचा समावेश आहे. या तिघांनाही चिपळूण पोलिसांनी ६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १०:४० वाजता त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांना अटक झाल्यानंतर तिघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली. जामीन अर्ज केला असता तो फेटाळण्यात आला.
संशयितांमधील मुझफ्फर इनामदार परदेशात नोकरी करतो. तो ६ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता चिपळुणात आल्यानंतर रात्री १० पर्यंत घरीच होता. मित्रांसाठी आणलेल्या वस्तू देण्यासाठी तो घराबाहेर पडला. मारहाणी दरम्यान हे तिन्ही तरुण जिथे होते, तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहेत. ज्यांचा या घटनेशी संबंध नाही, अशांवर पोलिसांनी कारवाई केली.
संशयित सापडत कसे नाहीत?
केवळ शाबासकी मिळवण्यासाठी तातडीने ही कारवाई झाली. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व त्याचे साथीदार अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. हे संशयित चिपळुणात येतात, त्यांचा वाढदिवस साजरा करतात आणि निघून जातात, तरीही पोलिसांना थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे निरपराध तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे. मुलांवरील अत्याचाराची त्रयस्थ समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. यासाठी ५ फेब्रुवारीपासून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर तरुणांचे पालक, विविध संस्थांच्या माध्यमातून आमरण उपोषण केले जाणार असल्याची माहिती शाह यांनी दिली.