(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी येथील म्हापार्लेवाडीमध्ये किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद रात्री उशिरा घरात घुसून धमकी व मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास साक्षीदार प्रकाश धोंडू म्हापार्ले यांच्या घरातील भोपळा आरोपी घेऊन जात असताना, “भोपळा का नेत आहेस?” असा जाब विचारण्यात आला. यावरून आरोपी सुधीर विष्णु दिवाळे (वय ४२, रा. कळंबुशी, म्हापार्लेवाडी) याने संताप व्यक्त करत शिवीगाळ केली तसेच उपस्थित फिर्यादी सानिका सचिन दिवाळे यांनाही “तुम्हाला बघून घेतो, सुरा आणून एकेकाला भोसकेन,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास आरोपी पुन्हा फिर्यादीच्या घरी पोहोचला. घरात घुसून “तुझा पती सचिन कुठे गेला, त्याला बघतो,” अशी धमकी देत शिवीगाळ करत घरभर फिरू लागल्याचे सांगण्यात आले. या वेळी त्याला अडवण्यासाठी पुढे गेलेल्या सुनिता दत्ताराम दिवाळे (वय ७२) यांना आरोपीने ढकलाबुकल केल्याने त्या जमिनीवर पडल्या आणि त्यांच्या कमरेला दुखापत झाली.
या घटनेनंतर सानिका सचिन दिवाळे (वय ३५, व्यवसाय शेती व गृहिणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ३३३, ३५२, ३५१(३) आणि ११५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद २५ मार्च रोजी मध्यरात्री १२.५४ वाजता करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

