(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे, चाफवली आणि मेघी या पंचक्रोशी भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने अचानक हजेरी लावली. आज सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी सुरुवातीला आंबा आणि काजूला चांगला मोहर आला होता. मात्र, त्यानंतर वाढलेल्या तीव्र उष्णतेमुळे हा मोहर करपून काळा पडला. त्यामुळे उत्पादन आधीच घटण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यातच आता मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या या अवकाळी पावसाने उरले-सुरले उत्पन्नही धोक्यात आले आहे.
आंबा-काजू बागायतदारांनी खत, फवारणी, बागांची देखभाल, राखणदार यासाठी मोठा खर्च केलेला आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. पावसामुळे फुलोरा आणि लहान फळांवर परिणाम होण्याची शक्यता असून उत्पादनावर मोठा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
एकीकडे प्रचंड उष्णतेचा तडाखा आणि दुसरीकडे अचानक आलेला पाऊस, या दुहेरी संकटामुळे कोकणातील शेतकरी हतबल झाला आहे. “निसर्गाची ही अवकृपा नेमकी कधी थांबणार?” असा सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

