(संगमेश्वर / एजाज पटेल)
ज्या हातांनी हजारो रुग्णांची निःस्वार्थ सेवा केली, ज्या आपुलकीच्या शब्दांनी अनेकांना जगण्याचा आधार दिला आणि ज्या हसऱ्या चेहऱ्याने प्रत्येक दुःखी मनाला दिलासा दिला, तो माणुसकीचा झरा अखेर आटला. संगमेश्वर तालुक्यातील कोंडये येथील रहिवासी आणि फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्राचे सेवानिवृत्त आरोग्य परिचर रवींद्र धोंडू सुर्वे (वय ६७) यांचे २५ मार्च रोजी चिपळूण येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ‘आर. डी. सुर्वे’ तथा ‘बाळा सुर्वे’ या नावाने पंचक्रोशीत परिचित असलेल्या या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने संपूर्ण खाडीपट्ट्यावर शोककळा पसरली असून, एका निस्वार्थी सेवापर्वाची सांगता झाली.
परिचर नव्हे, रुग्णांचे खरे कैवारी
आरोग्य व्यवस्थेत ‘परिचर’ हे पद अनेकदा पडद्यामागे राहते; मात्र बाळा सुर्वे यांनी आपल्या कार्यातून या पदाला वेगळी उंची दिली. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत राहून असंख्य रुग्णांची सेवा केली. दवाखान्यात येणारा रुग्ण गरीब असो वा गंभीर, सुर्वे यांची माया सर्वांसाठी सारखीच होती. डॉक्टर उपचार करत असताना रुग्णांचे मन सावरणे, त्यांना धीर देणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही आधार देणे, ही जबाबदारी ते तितक्याच आत्मीयतेने पार पाडत. सहा वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले असले, तरी त्यांच्या कार्याच्या आठवणी आजही त्या आरोग्य केंद्राच्या प्रत्येक भिंतीवर कोरलेल्या आहेत.
अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आणि दातृत्वाचा वारसा
बाळा सुर्वे हे केवळ शासकीय कर्मचारी नव्हते; ते चालते-बोलते समाजकार्य होते. ‘अजातशत्रू’ ही त्यांची खरी ओळख होती. कुणाच्याही अडचणीत धावून जाणे आणि सढळ हाताने मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता. स्वतःच्या पगारातून गरजू रुग्णांच्या औषधोपचारासाठी मदत करणे, संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधार देणे, अशा अनेक गोष्टी त्यांनी आयुष्यभर केल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि मनातील सकारात्मकता शेवटच्या काळातही तशीच कायम होती.
२०१७ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि त्यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. या धक्क्याने ते मनातून खचले; मात्र अशा कठीण काळात त्यांचा पुतण्या विश्वनाथ विलास सुर्वे यांनी त्यांना आपल्या वडिलांप्रमाणे आधार दिला. चिपळूण येथे पुतण्याकडे वास्तव्यास असतानाच त्यांची प्रकृती खालावली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज थांबली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बाळा सुर्वे यांच्या निधनाची वार्ता समजताच फुणगूस, कोंडये आणि संपूर्ण खाडीपट्ट्यात शोककळा पसरली. ग्रामस्थ, नातेवाईक आणि आरोग्य विभागातील सहकारी मोठ्या संख्येने चिपळूण येथे जमले.
रात्री उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. “आमचा हक्काचा माणूस हरपला,” अशी भावना उपस्थित प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती.
मोठा परिवार, अपूर्ण राहिलेली पोकळी
त्यांच्या पश्चात भाऊ विलास सुर्वे, रामचंद्र सुर्वे, नरेंद्र सुर्वे, पुतणे विश्वनाथ सुर्वे, राजेश सुर्वे, बहीण लक्ष्मी लबडे, राजश्री घोसाळकर असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सुर्वे कुटुंबासह संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एका माणुसकीच्या झऱ्याचा कायमचा अंत झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

