(राजापूर / तुषार पाचलकर)
“कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे, मात्र नोकरीच्या निमित्ताने होणारे स्थलांतर ही चिंतेची बाब आहे. विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश मिळवावे. जेव्हा हे गुणवंत विद्यार्थी खऱ्या अर्थाने यशस्वी होतील, तेव्हाच महाविद्यालयाचा वर्धापन दिन सार्थ ठरेल,” असे प्रतिपादन संस्थेचे सदस्य विजय उर्फ बाबा सावंत यांनी केले.
ते श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस नरेश पाचलकर, सदस्य अशोक सक्रे, चंद्रकांत लिंगायत, सिद्धार्थ जाधव, माजी सरचिटणीस नारायण पांचाळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एस. मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने वातावरण मंत्रमुग्ध झाले. प्रास्ताविकात डॉ. विकास पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले.
‘सह्यगिरी’ या महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे आणि डॉ. बी.टी. दाभाडे लिखित ‘कोकणातील गौरी गणपती गीते’ या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथलेखक डॉ. दाभाडे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
प्राचार्य डॉ. पी.एस. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून, विद्यार्थ्यांनी उपलब्ध मार्गदर्शनाचा लाभ घेऊन स्वतःला सिद्ध करावे.”
सरचिटणीस नरेश पाचलकर यांनी संस्थेच्या विकासातील मान्यवरांच्या योगदानाचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी त्या स्वप्नांची पूर्तता करावी, असे आवाहन केले. “संस्थेचा संघर्षमय इतिहास लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाला योग्य दिशा द्यावी,” असे मत अशोक सक्रे आणि नारायण पांचाळ यांनी व्यक्त केले.
वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, मराठी भाषा व वाङ्मय मंडळाच्या ‘मायबोली’ या भित्तीपत्रिकेचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. बी.टी. दाभाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. पी.पी. राठोड यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

