( रत्नागिरी /प्रतिनिधी )
नंदाई प्रतिष्ठान, हातखंबा या सामाजिक संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा रविवार, ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. हातखंबा हायस्कूल येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे, तसेच समाजातील गुणवंत आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान करणे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच त्यांच्या यशातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी, या हेतूने प्रतिष्ठानने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. आनंद आंबेकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अभय तेली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या वेळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘सावित्रीबाई फुले सेवाभावी पुरस्कार-२०२६’ प्राथमिक आरोग्य केंद्र, चांदेराई येथील डॉ. श्यामसुंदर अनंत मारे यांना प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील बौद्ध समाजातील विद्यार्थी, पालक तसेच समाजबांधवांनी या गुणगौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नंदाई प्रतिष्ठानचे सचिव अनंत सावंत यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा सोहळा नव्या पिढीला शिक्षणाची प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वासही प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

