( रत्नागिरी )
शहरातील थकीत घरपट्टी व कर वसुलीसाठी नगर परिषद प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत थकबाकीदारांविरुद्ध थेट कारवाई सुरू केली आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर जप्ती पथकाकडून कठोर पावले उचलली जात असून, शहरात या मोहिमेमुळे खळबळ उडाली आहे. मुख्याधिकारी गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ७३ मालमत्तांना टाळे ठोकून त्या सील करण्यात आल्या आहेत. तसेच, घरपट्टी थकवलेल्या ६१ मालमत्तांचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करण्यात आले असून संबंधितांना कडक नोटिसा देण्यात आल्या आहेत. उर्वरित थकबाकीदारांविरुद्धही अशीच कारवाई युद्धपातळीवर सुरू असल्याने अनेकांच्या धास्ती वाढली आहे.
आर्थिक वर्षाच्या अखेरीचा कालावधी लक्षात घेता कर वसुली वाढवण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांना कर भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत २१, २२, २६, २८, २९ आणि ३१ मार्च २०२६ या सुटीच्या दिवशीही नगर परिषदेचे कार्यालय खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेळेत कर भरून कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
सध्या पालिकेकडे एकूण १५ कोटी ८७ लाख ५० हजार ६४८ रुपयांची मागणी असून, त्यापैकी १० कोटी ३१ लाख १३ हजार ०६१ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. म्हणजेच एकूण वसुली ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. उर्वरित ३५ टक्के रक्कम वसूल करण्यासाठी जप्ती पथके शहरातील विविध भागांत सक्रियपणे कार्यरत आहेत.

