( रत्नागिरी )
स्वस्तिक हॉस्पिटल व चिरायू हॉस्पिटलच्या संस्थापिका तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनिता रमेश चव्हाण यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
डॉ. सुनिता रमेश चव्हाण यांनी सन १९६६ मध्ये आपले पती व रत्नागिरीतील पहिले जनरल सर्जन डॉ. रमेश चव्हाण यांच्या सहकार्याने वैद्यकीय सेवेची सुरुवात केली. त्यांनी केवळ रुग्णसेवाच केली नाही, तर कोकणातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या सासऱ्यांनी स्थापन केलेल्या स्वस्तिक हॉस्पिटलच्या आधुनिकीकरणात त्यांचा मोठा वाटा होता. तसेच २००३ साली त्यांनी अत्याधुनिक चिरायू हॉस्पिटलची स्थापना केली. या माध्यमातून एकेकाळी मुंबई-पुण्यासाठी जावे लागणाऱ्या अनेक आरोग्य सुविधा रत्नागिरीतच उपलब्ध झाल्या.
डॉ. चव्हाण या चव्हाण कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ होत्या. त्यांच्या सेवाभावी कार्याचा वारसा त्यांची पुढील पिढी समर्थपणे पुढे नेत आहे. त्यांच्या पश्चात पती डॉ. रमेश चव्हाण, मुलगा डॉ. नितीन चव्हाण (अस्थिरोग तज्ञ), सून डॉ. ज्योती चव्हाण (स्त्रीरोग तज्ञ), मुलगी डॉ. पल्लवी यादव (नेत्ररोग तज्ञ) आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ४ वाजता स्वस्तिक बंगला येथून निघणार असून, चर्मालय स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

