(चिपळूण)
तालुक्यातील भोम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये तब्बल 17 लाख 75 हजार 375 रुपये 20 पैसे इतक्या रकमेचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. संस्थेचे लेखापरीक्षण करीत असताना हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी संस्थेचा तत्कालीन सचिव योगेश प्रमोद भोबेकर (रा. मालदोली, ता. चिपळूण) याच्या विरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाचप्रकारे अन्य तीन सोसायट्यांमध्येदेखील गैरप्रकार झाल्याचे बोलले जात असून येथील सहकार निबंधक कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्या सोसायटींच्या ऑडिटनंतरच हा अपहार पुढे येणार आहे.
याबाबत चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव रामचंद्र ठसाळे (वय 42, रा. चिपळूण) हे महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यात लेखा परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 2023-2024 या वर्षाचे भोम विविध कार्यकारी सोसायटीचे लेखापरीक्षण केले. या तपासणीदरम्यान संस्थेचा सचिव कर्मचारी योगेश प्रमोद भोबेकर याने संस्थेच्या व्यवहारांची चुकीची माहिती संचालक आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू न देता अपहार केल्याचे आढळून आले आहे.
लेखापरीक्षणात भोबेकर याने एकूण 17 लाख 75 हजार 375 रुपये 20 पैसे इतक्या रकमेचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. याची माहिती मिळताच संस्थेचे लेखा परीक्षक वैभव ठसाळे यांनी भोम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, भोमचे वैधानिक लेखा परीक्षक या नात्याने चिपळूण पोलिस ठाण्यात आरोपी योगेश प्रमोद भोबेकर याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यानुसार भोबेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम 420 (फसवणूक) आणि 406 (गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सहकारी संस्थेत एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
…अन्य सोसायट्यांमध्ये अपहार?
भोम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये 17 लाखांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षणातून पुढे आले आहे. याच खाडीपट्टा भागातील मालदोली, भिले, कालुस्ते या सहकारी सोसायट्यांमध्ये देखील अशाच पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार झाल्याची जोरदार चर्चा आहे. कारण, भोम अपहार प्रकरणातील संशयित आरोपी योगेश भोबेकर हादेखील उर्वरित खाडीपट्ट्यातील संस्थेशी संबंधित आहे. त्यामुळे मालदोली, भोम, कालुस्ते या सहकारी सोसायट्यांच्या लेखापरीक्षणानंतर गैरव्यवहाराचा आकडा आणखी वाढणार आहे. या गैरव्यवहाराची खाडीपट्ट्यासह सहकार क्षेत्रात आता जोरदार चर्चा रंगली आहे.