(चिपळूण / वार्ताहर)
कृषी क्षेत्रासह शिक्षण, सहकार आणि साहित्य क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या ४९व्या ‘गावंढळ’ या नवीन कादंबरीचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. मराठी साहित्य व सांस्कृतिक महामंडळाचे उपाध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. चोरगे हे कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे संस्थापक तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत.
या वेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांनी डॉ. चोरगे यांच्या लेखनातील सामाजिक जाणीव, बांधिलकी आणि वास्तवाचे प्रभावी चित्रण या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. कृषी क्षेत्रातील यशस्वी कार्यासोबतच लेखनाची आवड जपत त्यांनी सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर साहित्यनिर्मिती केली असून, त्यातून साहित्यविश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. चोरगे यांच्या लेखनात समाजभान, सामाजिक बांधिलकी, सामाजिक वास्तव आणि ज्वलंत प्रश्नांचा सखोल अभ्यास यांचा समन्वय दिसून येतो. ‘गावंढळ’ या कादंबरीतही या वैशिष्ट्यांचा प्रत्यय येतो, असे डॉ. ढवळ यांनी नमूद केले. माणसाचे कर्तृत्व त्याच्या कार्यातून आणि लेखनातून समोर येते. ‘गावंढळ’ या शब्दामध्ये प्रेम आणि आपुलकीची भावना आहे. ही कादंबरी वाचकाला अस्वस्थ करणारी असून, तिच्यातील व्यक्तिमत्त्वांचे सखोल चित्रण, अलंकारिक भाषा, सहज शब्दरचना आणि आशयपूर्ण मांडणी ही लेखकाच्या लेखनशैलीला साजेशी असल्याचेही त्यांनी सांगितले.
केशवसुत स्मारक, मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी डॉ. चोरगे यांच्या बहुआयामी कार्याचा उल्लेख केला. कृषी, शिक्षण, सहकार, साहित्य, क्रीडा आणि नाटक अशा विविध क्षेत्रांत त्यांचे योगदान दिसून येते. ‘गावंढळ’ ही कादंबरी समाजातील सत्य परिस्थितीवर आधारित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनीही या कादंबरीत समाजातील वास्तवाचे जळजळीत प्रतिबिंब उमटल्याचे सांगितले. काळाबरोबर समाज बदलत असला, तरी संस्कारांचे महत्त्व कायम असून त्यांची जपणूक होणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करताना स्वतःच्या संस्कृतीचा विसर पडू देऊ नये, असे आवाहन करत त्यांनी कादंबरीतील कुटुंबव्यवस्थेचे वास्तववादी चित्रण मनाला चटका लावणारे असल्याचे सांगितले.
‘गावंढळ’चे लेखक कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आपल्या मनोगतात लेखनप्रक्रियेविषयी भूमिका स्पष्ट केली. स्वतःच्या अनुभवांतून आपण लेखन करत गेलो असून, आपल्या साहित्यात समाजाशी निगडित विषयांना महत्त्व दिले आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षण आणि शेती या समाजसुधारणेतील महत्त्वाच्या बाबी असून, त्यांच्याकडे याच दृष्टिकोनातून पाहत आपण लेखन केले आहे. समाजातील सत्य परिस्थिती आणि विचार मांडणे ही आपल्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. खरा लेखक वेळेचे कारण देऊन लेखन टाळत नाही किंवा वेळेबाबत कुरकुर करत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकाशन सोहळ्याला कादंबरीचे लेखक तथा कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, मराठी साहित्य व सांस्कृतिक महामंडळाचे उपाध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, केशवसुत स्मारक, मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील, कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, संस्थेच्या संचालिका प्रा. सौ. अंजलीताई चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे आणि गोविंदरावजी निकम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन तांबेकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापकवृंद, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


