(राजापूर / प्रतिनिधी)
गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रुक, नवेदर येथे एका तरुणाचा गणपती विसर्जनावेळी तळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे उत्सवाच्या जल्लोषावर विरजण पडले असून परिसरात शोककळा पसरली आहे. विक्रांत संतोष पोकळे (वय २०) असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे.
यंदाचा गणेशोत्सव राजापूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा होत होता. मंगळवारी गौरी-गणपतींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात सुरू असतानाच ही घटना घडली. नवेदर गावातील ग्रामस्थ नेहमीप्रमाणे गावातील गणपतींचे विसर्जन स्थानिक तळ्यात करत होते. संध्याकाळी विसर्जन सोहळा पार पडल्यानंतर ग्रामस्थ घरी परतले.
मात्र बराच वेळ लोटला तरी विक्रांत घरी न परतल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतल्यावर, ज्या तळ्यात गणपती विसर्जन करण्यात आले होते, त्याच तळ्यात विक्रांत बुडून मृतावस्थेत सापडल्याचे स्पष्ट झाले. गावातील उत्साही तरुणाचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने संपूर्ण नवेदर गावावर शोककळा पसरली आहे. आनंद आणि भक्तीच्या वातावरणात घडलेली ही घटना ग्रामस्थांना चटका लावून गेली आहे.

