(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाले आहेत. समुद्रकिनारे, निसर्गरम्य ठिकाणे आणि उत्सवी वातावरण अनुभवण्याच्या अपेक्षेने आलेल्या पर्यटकांचे स्वागत मात्र शहरात प्रवेश करतानाच खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांनी केले आहे. रत्नागिरी शहरात येताना खेडशी–महालक्ष्मी मार्ग, रेल्वेस्थानक परिसर, जे. के. फाइल परिसर आदी प्रमुख मार्गांवरील खड्ड्यांनी वाहनचालक व पर्यटकांची अक्षरशः दमछाक केली आहे.
या रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे चुकवताना वाहनांची कसरत सुरू असून, वाहतूक संथ गतीने होत आहे. काही ठिकाणी तर खड्ड्यांमुळे गाड्यांना धक्के बसत असल्याने वाहनांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः बाहेरून आलेल्या पर्यटकांना या रस्त्यांची कल्पना नसल्याने ते अधिकच हैराण झाले आहेत.
“कोकण सुंदर आहे, पण रस्त्यांची अवस्था पाहून धक्का बसला,” अशी प्रतिक्रिया अनेक पर्यटकांकडून व्यक्त होत आहे. खड्ड्यांमुळे केवळ गैरसोयच नव्हे तर अपघातांचाही धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्याने वाहनचालकांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढलेली गर्दी आणि त्यातच खराब रस्ते यामुळे रत्नागिरीची प्रतिमा मलीन होत असल्याची खंत देखील स्थानिक नागरिकांसह वाहनचालक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, दरवर्षी पर्यटन हंगामात रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर येतो; नववर्षाच्या जल्लोषात रत्नागिरीत दाखल झालेल्या पर्यटकांना खड्ड्यांतून वाट काढावी लागणे ही प्रशासनासाठी निश्चितच लाजिरवाणी बाब ठरत आहे. आता तरी संबंधित यंत्रणांनी तत्काळ दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

