(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सध्या सकाळ सत्रात सुरू झाल्या असून या शाळांची वेळ बदलण्याची मागणी अनेक ठिकाणच्या पालक व ग्रामस्थांमधून लागली आहे. याबाबत तालुक्यातील चाफे, वरची निवेंडी, भगवतीनगर या भागातील पालक व ग्रामस्थांनी सांगितले की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या सकाळच्या सत्रात सुरू करण्यात आल्या असून त्यांची वेळ ही सकाळी सात ते साडेअकरा अशी आहे. सदर वेळ ही पालक व विद्यार्थ्यांना अडचणीची ठरत असून सकाळची शाळा भरण्याची वेळ ही पूर्वीप्रमाणे साडेसात वाजता करावी, अशी मागणी होत आहे.
सदर जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या काही मुलांना अर्धा ते पाऊण तास चालत जावे लागते. तसेच सगळ्याच मुलांच्या पालकांकडे दुचाकी किंवा चार चाकी वाहने नाहीत. त्यामुळे अनेक लहान वयातील विद्यार्थी शाळेसाठी पायी ये- जा करीत असतात . त्यातच जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या मुलांना अर्धा ते पाऊण तास चालत जावे लागत असल्यामुळे सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी आपले घर सोडावे लागते. तसेच ग्रामीण भागात अजूनही बिबट्याचे संकट कायम आहे. त्यामुळे पालकांची सुद्धा फरफट होत आहे.
बिबट्याची दहशत कायम असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आहे उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लहान मुलांचा कोणताही विचार न करता प्रशासनाने घेतलेला हा बदलता निर्णय रद्द करून सकाळची शाळा ही पूर्वीप्रमाणे साडेसात ते साडेअकरा या वेळेतच भरावी अशी मागणी होत आहे.

