(पुणे)
पुणे जिल्ह्यातील चाकण येथे भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या हल्ल्यात 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शोभा विजय वाघमारे असे मृत महिलेचे नाव असून सोमवारी मध्यरात्री आंबेठाण चौक परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शोभा वाघमारे या सोमवारी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात होत्या. त्याचवेळी सहा ते सात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने त्यांना घेरून अचानक हल्ला केला.
सीसीटीव्हीत थरारक घटना कैद
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. फुटेजमध्ये दिसत आहे की, शोभा यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी दगड उचलून कुत्र्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने त्यांना स्वतःचा बचाव करता आला नाही. कुत्र्यांनी त्यांच्या हात, पाय, चेहरा आणि मानेवर हल्ला करत गंभीर जखमा केल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे अवघ्या पंधरा मिनिटांतच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला
पहाटेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला या घटनेमागे खून किंवा अत्याचाराचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर चाकण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत नागरिकांचा आरोप
चाकण औद्योगिक परिसर आणि शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे केली होती. मात्र, या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नसबंदी आणि लसीकरण मोहीम राबवली जात असल्याचा दावा केला जात आहे. शहरातील सुमारे 600 कुत्र्यांपैकी 400 कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आल्याचेही सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

