( सोलापूर )
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सलग सणांच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीच्या निर्णयानुसार गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तीन दिवसांमध्ये मध्यरात्री १२ ते पहाटे २ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांसाठी मंदिर २४ तासांऐवजी २२ तास खुले राहणार आहे.
सलग सणांमुळे मोठ्या गर्दीची शक्यता
पुढील आठवड्यात सलग महत्त्वाचे सण येत आहेत. त्यामध्ये गुरूवार (19 मार्च) गुढीपाडवा, शुक्रवार (20 मार्च) स्वामी समर्थ प्रकट दिन, शनिवार (21 मार्च) रमजान ईद आणि त्यानंतर (22 मार्च) रविवारची सुट्टी असल्यामुळे अक्कलकोट येथे राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. ही गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा
भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता महिला आणि पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे दर्शन व्यवस्था अधिक सुरळीत होईल, असा विश्वास मंदिर प्रशासनाने व्यक्त केला आहे.
सुरक्षेवर विशेष भर
अलीकडेच त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिर येथे सुरक्षारक्षकाकडून भाविकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट मंदिर प्रशासनाने सुरक्षेची विशेष काळजी घेतली आहे. भाविकांनी संयम राखून आणि प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेचे पालन करून शांततेत दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.

