(चिपळूण- रत्नागिरी /प्रतिनिधी)
भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली टीडब्ल्यूजे कंपनीचे मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर आणि संचालक नेहा नार्वेकर या दाम्पत्याला रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. त्यानंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नार्वेकर दाम्पत्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती. संभाव्य तणावाची दखल घेत पोलिसांनी न्यायालयाबाहेर कडक बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. दरम्यान, दरमहा ३ ते ४ टक्के परताव्याचे आकर्षक आश्वासन देत टीडब्ल्यूजे कंपनीमार्फत अनेक गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक स्वीकारण्यात आली होती. ठेकेदार प्रतीक माटे यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये, तसेच त्यांच्या बहिणीकडून २५ लाख रुपये अशा एकूण २८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारून परतावा न देता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप समीर आणि नेहा नार्वेकर यांच्यावर आहे.
या प्रकरणी काही महिन्यांपूर्वीच चिपळूण पोलीस ठाण्यात नार्वेकर दाम्पत्यासह कंपनीच्या दोन प्रतिनिधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर फसवणूक झालेल्या इतर गुंतवणूकदारांनीही पुढे येत चिपळूण आणि रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेकडे स्वतंत्र तक्रारी नोंदवल्या आहेत. गुंतवणूकदारांची वाढती संख्या आणि व्यवहारातील मोठी रक्कम लक्षात घेता या फसवणुकीची व्याप्ती कराडपर्यंत पोहोचल्याचे तपासातून समोर येत आहे. या आधीच या प्रकरणात संकेश घाग याला अटक करण्यात आली असून, राज्यातील विविध भागांत समीर व नेहा नार्वेकर यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हे नोंदवले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी ठाणे येथे अटक झाल्यानंतर शनिवारी रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली.
टीडब्ल्यूजे कंपनीचे शहरातील बायपास मार्गावर आलिशान कार्यालय कार्यरत होते. मोठा कर्मचारी वर्ग, आकर्षक सादरीकरणे आणि विश्वासार्हतेची प्रतिमा निर्माण करून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले होते. मात्र फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कार्यालय अचानक बंद करण्यात आले. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने कार्यालयाची तपासणी करून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून तपास अधिक गतीने सुरू आहे.

