(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
गेली अनेक वर्षे संगमेश्वर तालुक्यावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. अनेक निवडणुकांमधून ते स्पष्ट झाले आहे. अंतर्गत स्तरावर कितीही वादळे आली तरी तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील शिवसैनिक अजूनही जागेवरच आहेत. म्हणूनच चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळावा आणि संगमेश्वर तालुक्यातीलच उमेदवाराला तिकीट मिळावे, अशी शिवसैनिकांची मागणी असल्याचे संगमेश्वर तालुकाप्रमुख नंदादीप ऊर्फ बंड्या बोरूकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
साडवलीत झालेल्या या पत्रकार परिषदेला संजय (पप्पू) नाखरेकर, साडवलीचे माजी सरपंच राजेश जाधव, माजी नगरसेवक वैभव पवार, माजी सभापती संतोष लाड, तेजस शिंदे, धोंडू करंबेळे, ज्येष्ठ शिवसैनिक भाई जाधव, बावा वाजे, प्रदीप ढवळ, अरुण बने, संदीप धावडे, प्रदीप गुरव, बेलारी सरपंच संदेश घाग उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संगमेश्वर तालुक्याला उमेदवारी मिळावी यासाठी तालुक्यातील उद्धवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. उद्धवसेनेला डावलले जात असल्याने निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची घुसमट होत आहे. उमेदवारी न दिल्यास शिवसेनेतून उद्रेक पाहायला मिळण्याची शक्यता आहे, असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.
या कारणाने शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना
महाविकास आघाडीतील घटक पक्षाला उमेदवारी देऊन आम्हाला यात डावलले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. अनेक वर्षे आमदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आहेत. संघटना मजबूत असतानाही येथे उमेदवारी मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आल्याचे बोरुकर म्हणाले.