(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड भंडारवाडा येथील गोपाळकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने शिमगोत्सवाचे औचित्य साधून भंडारवाडा प्रीमियर लीग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मालगुंड भंडारवाडा येथील भंडारी टायगर संघाने आपल्या सांघिक कामगिरीच्या पटकावले तर मालगुंड भंडारवाडा येथील भंडारी वॉरियर्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सदर स्पर्धा मालगुंड भंडारवाडा साने शेजारील मैदानावर खेळविण्यात आली. ही स्पर्धा मालगुंड भंडारवाडा मर्यादित ठेवण्यात आली होती.
भंडारवाडा परिसरातील एकूण दहा संघांनी या स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता. यामध्ये अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा व चुरशीचा झाला. त्यामध्ये भंडारी टायगर संघाने भंडारी वॉरियर्स संघावर मात करीत अंतिम विजेतेपद पटकावले. या विजेत्या संघाला रोख रुपये दहा हजार व भव्य दिव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपविजेत्या संघाला रोख रूपये पाच हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंना आकर्षक बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा उत्कृष्ट नियोजनात गोपाळ कृष्ण मित्र मंडळाच्या वतीने पार पाडण्यात आली.

