(रत्नागिरी)
तालुक्यातील निवळी–जयगड रोडवरील तिवराट पोलीस चेकपोस्टजवळील तरवळ गावात शनिवारी (१८ मे २०२५) दुपारी १२.३० वाजता दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन एक अपघात घडला. या घटनेत इको गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या अपघातात वाघवे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील बापू दिनकर कांबळे (वय ३६) यांच्या इको वाहनाला (क्र. एमएच ११ एडब्ल्यू ८७१२) समोरून येणाऱ्या इर्टिंगा गाडीने (क्र. एमएच १४ जेआर ५८००) जोरदार धडक दिली. आरोपी शुभम अनिल भोसले (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) याने त्याचे वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूने बेजबाबदारपणे चालवले, असा आरोप फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या निवेदनात केला आहे.
फिर्यादी बापू कांबळे हे कोल्हापूर येथून गणपतीपुळेच्या दिशेने प्रवास करत होते. तिवराटजवळ एका डाव्या वळणावर हा अपघात घडला. अपघातानंतर रत्नागिरी पोलीस ठाण्यात १९ मे रोजी पहाटे १.०७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गु.र.नं. १३/२०२५).
या प्रकरणी शुभम भोसले याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१ (जीवितास धोका निर्माण करणारी कृती) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ (धोकादायक वाहनचालना) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.