(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहर व परिसरात आज (सोमवारी) पहाटेच्या सुमारास अचानक दाट धुक्याची चादर पसरल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या धुक्यामुळे काही काळ दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
पहाटेपासूनच शहरातील अनेक भागांत वातावरणात दाट धुके पसरले होते. रस्ते, इमारती आणि झाडांच्या परिसरात धुक्याची पांढरी चादर दाटल्याने दृश्यमानताही काही प्रमाणात कमी झाली होती. सकाळच्या वेळी फिरायला किंवा कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना हे बदललेले वातावरण अनुभवायला मिळाले. अलीकडील काळात उष्णतेची तीव्रता वाढत असताना अचानक धुके निर्माण झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. वातावरणातील आर्द्रता आणि तापमानातील बदलामुळे हा प्रकार घडला असावा, असा अंदाज हवामान जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, काही काळ टिकून राहिलेल्या या धुक्यामुळे सकाळचे वातावरण प्रसन्न झाले होते. वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा तात्पुरता गारवा नागरिकांना सुखावून गेला.

