(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना संगमेश्वर ते बावनदी दरम्यान अचानक रस्ता बंद करून तयार करण्यात येणाऱ्या डायव्हर्जनमुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता महामार्ग बंद केला जात असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून वाहनांचे नुकसानही होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
महामार्गावरील कामाच्या ठिकाणी अनेक ठिकाणी अचानक रस्ता बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र या ठिकाणी सूचना फलक, परावर्तक चिन्हे, प्रकाशयोजना किंवा अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना अपुऱ्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी चालकांना अचानक वळण घ्यावे लागत असून वाहनांचा ताबा सुटून अपघात होण्याचे प्रकार वाढत आहेत. विशेषतः संगमेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणावर डायव्हर्जन देण्यात आल्याने वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे. वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून मोठ्या वाहनांसह दुचाकी व चारचाकी चालकांना बदललेल्या मार्गाचा अंदाज न आल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी प्रशासन व संबंधित ठेकेदारांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. महामार्गावरील कामे करताना स्पष्ट सूचना फलक, योग्य प्रकाशयोजना आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभारल्यानंतरच डायव्हर्जन देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.

