( तिरुवनंतपुरम )
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ वर्षाचा दणदणीत शेवट केला आहे. तिरुवनंतपुरम येथे झालेल्या पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर १५ धावांनी विजय मिळवत मालिका ५-० ने जिंकली.
प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाने २० ओव्हरमध्ये १७६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला ७ विकेट गमावून केवळ १६० धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी भारताने सामना जिंकत मालिकेतील सलग पाचवा विजय नोंदवला.
१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. कर्णधार चमारी अट्टापट्टू दुसऱ्याच ओव्हरमध्ये अवघ्या २ धावांवर बाद झाली. त्यानंतर हसिनी परेरा आणि इमेशा दुलानी यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत सामना रंगतदार केला.
मात्र इमेशा दुलानी अर्धशतकानंतर बाद होताच श्रीलंकेची लढत कमकुवत झाली. हसिनी आणि इमेशा यांनी ५६ चेंडूंमध्ये ७९ धावांची भागीदारी केली. इमेशाने ३९ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या आणि श्रीलंकेचा स्कोअर २ बाद ८६ असा झाला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दबाव वाढवत श्रीलंकेला विजयापासून दूर ठेवले.
या विजयासह भारताने श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत ५-० ने क्लीन स्वीप साधला. दरम्यान, २०२४ च्या महिला टी-20 विश्वचषकात गट टप्प्यातील अपयशानंतर भारतीय संघाने खेळाची शैली बदलली असून अधिक आक्रमक दृष्टिकोन स्वीकारल्याचे दिसून येते.
यावर प्रतिक्रिया देताना कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, “ही मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरली. विश्वचषकानंतर आम्ही चर्चा केली की टी-20 मध्ये आपल्याला अधिक आक्रमक खेळ करावा लागेल. पहिल्या तीन सामन्यांत गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली, त्यामुळे फलंदाजांवरील ताण कमी झाला.”

