(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भाजप महिला मोर्चा रत्नागिरी (दक्षिण) च्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देत स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) आणि गर्भपिशवी कर्करोगासंदर्भात माहिती घेतली. या भेटीत शहर व जिल्ह्यात महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिरे आयोजित करता येतील का, यासंदर्भात डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने प्रभागनिहाय आणि ग्रामीण भागातही आरोग्य तपासणी शिबिरे घेण्याचा प्रस्ताव सादर केला. यावर हॉस्पिटल प्रशासनाने आवश्यक वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी मोर्चाच्या वतीने अधिकृत निवेदनही सादर करण्यात आले.
या उपक्रमामागचा उद्देश महिलांमध्ये कॅन्सरसंबंधी जागरूकता वाढवणे, लवकर निदान होण्यासाठी तपासणी उपलब्ध करून देणे आणि जनहिताचे आरोग्यविषयक कार्य प्रभावीपणे राबवणे हा आहे. महिला मोर्चा लवकरच या संदर्भातील तपशीलवार योजना जाहीर करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
या बैठकीस भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, सरचिटणीस सौ. नुपूर मुळे, शहराध्यक्षा सौ. पल्लवी पाटील, तालुकाध्यक्ष सौ. प्रियल जोशी, माजी नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ तसेच सौ. प्रणाली रायकर, सौ. भक्ती दळी, सौ. सायली बेर्डे, सौ. वैभवी शिवलकर, सौ. कामना बेग, सौ. मनाली राणे आणि सौ. सारिका शर्मा या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
भाजप महिला मोर्चाच्या या सामाजिक भान असलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना वेळेत कॅन्सर तपासणीची सुविधा मिळावी, यासाठीच्या प्रयत्नांना महत्त्व प्राप्त होत आहे.