(रत्नागिरी / प्रतिनिधी)
बदलत्या हवामानामुळे आंबा बागांवर कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कृषी विभाग व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा उत्पादकांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शनात्मक ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तज्ज्ञ शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी आणि आंबा उत्पादक यांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यशाळेत पाहायला मिळाला. यापुढे ही कार्यशाळा दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता नियमितपणे आयोजित करण्यात येणार आहे.
या ऑनलाईन कार्यशाळेत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधक उपसंचालक डॉ. जालगावकर, भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. वानखेडे, कृषी विद्यापीठाचे कीटकनाशक तज्ज्ञ डॉ. मुळे तसेच वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. पोटफोडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेदरम्यान आंबा मोहराचे संरक्षण, आंबा फुलकिड व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल, याबाबत सखोल व शास्त्रीय माहिती देण्यात आली. तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना विद्यापीठाच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी सविस्तर उत्तरे देत शंका निरसन केले.
दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी होणाऱ्या या कार्यशाळेची ऑनलाईन लिंक संबंधित बागायतदारांना पाठविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कृषी सेवक, सहायक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या उपयुक्त कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

