(रत्नागिरी /प्रतिनिधी)
महामार्गावर भरधाव वेगाने आणि धोकादायक पद्धतीने वाहने चालवणाऱ्या बेशिस्त चालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने कडक पावले उचलली आहेत. विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक रडार तंत्रज्ञानाने सज्ज ‘इंटरसेप्टर’ वाहने दाखल झाली असून, या यंत्रणेच्या साहाय्याने नियमभंग करणाऱ्यांवर आता अधिक वेगाने आणि अचूक कारवाई होणार आहे.
अर्धा किलोमीटर (सुमारे ५०० मीटर) अंतरावरून वाहनाची नंबर प्लेट टिपण्याची क्षमता असलेली ही प्रणाली नियमभंग होताच तत्काळ नोंद करते. त्यानंतर संबंधित वाहनधारकाच्या मोबाईलवर पुराव्यासह ई-चलन पाठवले जाते. त्यामुळे वाहन न थांबवता थेट डिजिटल पद्धतीने दंड आकारण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.
या ‘इंटरसेप्टर’ वाहनावर उच्च दर्जाचे कॅमेरे, लेझर तंत्रज्ञान आणि रडार प्रणाली बसवण्यात आली आहे. दिवस असो वा रात्र, अंधारातही वाहनाचा वेग आणि क्रमांक स्पष्टपणे ओळखणे शक्य आहे. एका तासात तब्बल ३०० प्रकरणांची नोंद करण्याची क्षमता या यंत्रणेत आहे. विना हेल्मेट दुचाकीस्वार, विना सीटबेल्ट वाहनचालक, ट्रिपल सीट प्रवास तसेच अतिवेगाने वाहन चालवणे अशा विविध वाहतूक नियमभंगांवर या प्रणालीद्वारे कारवाई होणार आहे. यापूर्वी कर्मचारी प्रत्यक्ष वाहन थांबवून कारवाई करत असत. त्यामुळे काहीवेळा वाद, तणाव किंवा वाहतूक कोंडी निर्माण होत असे. आता मात्र वाहन न अडवता, छायाचित्रांसह पुरावा थेट चालकापर्यंत पोहोचणार असल्याने कारवाई अधिक पारदर्शक आणि परिणामकारक ठरणार आहे.
जिल्ह्यात वाढती वाहनसंख्या आणि महामार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षात घेता हे अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर’ वाहन प्रमुख महामार्गांवर तैनात करण्यात येणार असून, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी हा उपाय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

