(दापोली)
तालुक्यातील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळलेल्या एका डॉल्फिनला स्थानिकांनी तत्परतेने मदत करून समुद्रात सुरक्षित सोडले; मात्र काही तासांतच तोच डॉल्फिन पुन्हा किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हर्णे बायपासजवळील किनाऱ्यावर डॉल्फिन जखमी अवस्थेत असल्याचे काही स्थानिकांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी विलंब न लावता मदतीसाठी धाव घेतली. या बचाव मोहिमेत राखी आंबुर्ले, फहद जमादार, किरण चुनेकर, नारायण खोपटकर आणि धनराज पालेकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्या वेळी हर्णे दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक निर्मळ हेही घटनास्थळी उपस्थित होते.
सर्वांनी अत्यंत सावधगिरी बाळगत डॉल्फिनला पाण्यातून बाहेर काढले. प्राथमिक स्वरूपाची मदत देत बोटीच्या साहाय्याने त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. वेळेत केलेल्या या प्रयत्नांमुळे डॉल्फिनचे प्राण वाचल्याची आशा निर्माण झाली होती. मात्र काही कालावधीनंतर तोच डॉल्फिन पुन्हा किनाऱ्याजवळ दिसून आला. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच फहद जमादार यांनी कांदळवन विभाग यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर विभागाचे कर्मचारी विश्वंभर झाडे आणि वनरक्षक प्रभू साबणे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून संबंधित डॉल्फिनला पुन्हा समुद्रात सोडले.
रात्री उशिरा तोच डॉल्फिन पुन्हा किनाऱ्यावर येऊन अडकला आणि सकाळी स्थानिकांना तो मृत अवस्थेत आढळला. ही बाब तेथील रिसॉर्ट चालकांनी तात्काळ वनविभागाला कळवली. माहिती मिळताच वनरक्षक प्रभू साबणे व कर्मचारी विश्वंभर झाडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळी पंचनामा केला. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मृत डॉल्फिनवर किनाऱ्यावरच प्रोटोकॉलनुसार मृत डॉल्फिनचे सुरक्षित नष्टीकरण करण्यात आले. अशी माहिती वनरक्षक प्रभू साबणे यांनी दिली.

