(संगमेश्वर /एजाज पटेल)
संगमेश्वर सोनवी पुलावर आज दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास आयशर ट्रक आणि एर्टिगा कार यांच्यात अपघात होऊन काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
गुरुवारी दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास अपघाताची घटना घडली. या वेळी दोन्ही वाहने एकाच वेळी पुलावरून हातखंबा दिशेने जात असताना पूल अरुंद असल्याने एकमेकांना जोराची धडक दिल्याने दोन्ही गाड्या एकमेकांत अडकल्या. पुलाचा रस्ता अरुंद असल्याने आणि बाजूचा गर्डर पूर्वीपासून मोडकळीस आलेला असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. संबंधित ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी पाईपचा आधार देण्यात आला आहे. अपघाताची तीव्रता अधिक असती किंवा वाहनचालकांचे नियंत्रण सुटले असते तर मोठी दुर्घटना घडली असती,अशी चर्चा आहे.
अपघातानंतर दोन्ही गाड्या एकमेकांत अडकून बसल्याने त्या वेगळ्या करण्यासाठी स्थानिक नागरिक व इतर वाहनचालकांनी मोठी कसरत केली. प्रयत्नांती दोन्ही वाहने वेगळी करण्यात यश आले. त्यानंतर अपघातग्रस्त दोन्ही गाड्या सोनवी पुलाजवळील माभळे येथे हलविण्यात आल्या आणि रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अपघाताच्या वेळी चौकात पोलीस उपस्थित नव्हते. पोलीस येईपर्यंत वाहतूक कोंडी वाढत गेली. दरम्यान, कोंडीत एक रुग्णवाहिका अडकल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला वाहनचालकांनी पोलीस येईपर्यंत गाड्या न हलवण्याचा निर्णय घेतला होता; मात्र रुग्णवाहिकेत रुग्ण असल्याचे समजताच सर्वांनी माणुसकी दाखवत तातडीने गाड्या बाजूला घेतल्या आणि रुग्णवाहिकेला मार्ग करून दिला. स्थानिक नागरिकांनीही यात सक्रिय सहभाग घेतला.
सोनवी चौकात सध्या महामार्ग व उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पर्यायी मार्ग अरुंद असून दिशा दर्शक फलकांचा अभाव आणि अपुरी सुरक्षाव्यवस्था यामुळे हा चौक अपघाताला निमंत्रण देत आहे. मोठ्या वाहनांसह दुचाकींचेही किरकोळ अपघात येथे वारंवार घडत असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वीही याच ठिकाणी ट्रक आणि कार यांच्यात अशाच प्रकारचा अपघात झाला होता. त्यावेळी कार पुलाखाली कोसळण्यापासून थोडक्यात बचावली होती. तसेच एका मालवाहू वाहनाने एका वृद्ध महिलेला धडक दिल्याचीही घटना घडली होती; ती चाकाखाली येण्यापासून थोडक्यात बचावली होती.
या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा, स्पष्ट दिशादर्शक फलक लावावेत तसेच पूल आणि चौकातील सुरक्षाव्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे. अनेकदा येथे पोलीस अनुपस्थित असतात आणि वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी केवळ होमगार्डवर सोपवली जाते,असे अनेकदा दिसून येते.

