(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक अनिल शेट्ये यांना विश्व समता कलामंच या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा “विश्व समता राज्यस्तरीय समाजभूषण” पुरस्कार बहाल करण्यात आला. लोवले (ता. संगमेश्वर) येथील मयूरबाग परिसरातील शुभगंधा हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या या दिमाखदार सोहळ्यास तालुक्यासह जिल्हा व परजिल्ह्यातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या समतेच्या व मानवतावादी विचारसरणीवर चालणाऱ्या या संस्थेकडून गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. यंदाचा राज्यस्तरीय सन्मान अनिल शेट्ये यांना जाहीर झाल्याने संगमेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले होते. प्रत्यक्ष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व मानाचा पट्टा प्रदान करून गौरविण्यात आले.
व्यापारी ते समाजसेवक प्रेरणादायी प्रवास
अनिल शेट्ये हे तालुक्यातील प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळखले जात असले तरी त्यांची खरी ओळख समाजसेवक अशीच आहे. पैसाफंड शाळेचे संचालक म्हणूनही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. शिक्षण हा समाजपरिवर्तनाचा पाया आहे, या विश्वासातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फी मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.
गरजू कुटुंबांना आर्थिक मदत, आरोग्य शिबिरांना सहकार्य, रक्तदान शिबिरांचे आयोजन, आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत, धार्मिक व सामाजिक उपक्रमांना पाठबळ, तसेच विविध सामाजिक संस्थांना आर्थिक हातभार अशा अनेक माध्यमांतून त्यांनी कार्याचा ठसा उमटविला आहे.
घरातील वडिलांकडून मिळालेल्या समाजसेवेच्या संस्कारांचा वारसा त्यांनी जपला आहे. सत्तरी ओलांडलेल्या वयातही त्यांची कार्यतत्परता आणि समाजासाठीची तळमळ आजही तितकीच प्रेरणादायी आहे. “समाजाचे काही देणे लागतो” या भावनेतून ते सातत्याने कार्यरत असून, गरजूंना मदत करताना प्रसिद्धीपेक्षा समाधानाला अधिक महत्त्व देतात, ही त्यांची विशेष जमेची बाजू आहे.
पुरस्कार स्वीकारताना अनिल गजानन शेट्ये हे स्पष्टपणे भारावून गेले होते. डोळ्यांत दाटलेल्या अश्रूंनी आणि कंठ दाटून आलेल्या स्वरात त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. “हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझ्या कुटुंबाचा, मित्रपरिवाराचा आणि संगमेश्वर तालुक्यातील सर्व नागरिकांचा आहे. समाजासाठी केलेले कार्य हे कर्तव्य समजून केले; त्याबद्दल इतका मोठा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची मोठी पावती आहे,” असे ते भावनिक शब्दांत म्हणाले.
“माझ्या वडिलांनी दिलेले संस्कार आणि समाजाने दिलेला पाठिंबा यामुळेच मी हे कार्य करू शकलो. पुढेही शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी कार्यरत राहीन,” अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “समाजकार्य हे केवळ नावासाठी नसते; ते आयुष्यभर जपायची जबाबदारी असते. ज्येष्ठ वयातही सातत्याने समाजासाठी कार्य करणाऱ्या अनिल शेट्ये यांसारख्या व्यक्ती समाजाला दिशा देणाऱ्या दीपस्तंभासारख्या असतात.”
राज्यस्तरीय सन्मान मिळाल्याने संगमेश्वर तालुक्याच्या सामाजिक कार्याला नवे बळ मिळाले असून, अनिल शेट्ये यांच्या कार्यातून युवकांनी प्रेरणा घ्यावी, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

