(रत्नागिरी)
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळांमधील 50 विद्यार्थी नासा व इस्त्रो येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी जाऊन आले. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव मिळावा, या उद्देशाने अंतराळ संशोधन व उपग्रह प्रक्षेपण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत आज भाट्ये किनारी हाय अल्टीट्युड बलुन प्रक्षेपित करण्यात आला. अशा उपक्रमांमधून ज्ञान घेऊन, विद्यार्थी-विद्यार्थिनींमधून नवीन शास्त्रज्ञ तयार होतील आणि ते संशोधनात्मक काम करताना दिसतील, अशा शुभेच्छा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिल्या.
या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, कोस्टगार्डचे कमाडंट शैलेश गुप्ता, ग्रह स्पेसचे मलयकुमार बिस्वाल, प्रदीप राजन, सिलीकॉन टेक हिल्स रिसर्च फाऊंडेशनचे अजित गुरव, सागर साळुंखे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, सरपंच प्रिती भाटकर, शिक्षणाधिकारी किरण लोहार आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या पुढाकारातून तसेच सिलिकॉन टेक हिल्स रिसर्च फाउंडेशन, सातारा आणि ग्रह स्पेस, बेंगळुरू यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत विविध तालुक्यांतील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय अंतराळ विज्ञान व उपग्रह तंत्रज्ञान विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा स्वरूपाचा हा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम असून, तो राज्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे.
हाय अल्टीट्युड बलुन लाँचसारख्या अत्याधुनिक वैज्ञानिक उपक्रमाचा समावेश करुन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रक्षेपण, ट्रॅकिंग व डाटा विश्लेषणाचा अनुभव देण्यात येत आहे. 15 कि.मी. उंचीवर हा बलुन जाऊन दोन ते अडीच तासाच्या कालावधीत हवामानाच्यादृष्टीने छायाचित्र घेणार आहे. त्याचा डाटा मेन्टन होणार असून, पुढच्या अभ्यासासाठी उपयोग होऊ शकतो.
श्रीमती रानडे पुढे म्हणाल्या, जिल्हा परिषद रत्नागिरीने पहिल्यांदा महाराष्ट्रातला इस्रोआणि नासाचा अभ्यास दौरा सुरु केला आणि गेली तीन वर्ष सतत हा चालू आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांची निवड करताना तीन प्रकारच्या चाचणी आपण घेतो आणि याच्यातून स्क्रीनिंग होऊन जे विद्यार्थी निवडतो, त्यांना ही संधी मिळते. इस्त्रो आणि नासाला जाऊन आल्यावर पुढे काय.. या एका विचारातून हा आजचा कार्यक्रम आहे. या सगळ्यातून संशोधक निर्माण व्हावेत आणि भारताची शान वाढवणारे काम तुमच्या हातून व्हावं. आपल्यातले वैज्ञानिक उद्या आम्हाला भेटतील. स्पेस ऑर्गनायझेशन तसेच अन्य शास्त्रामध्ये संशोधन काम करताना दिसतील, अशी आशा बाळगते. सगळ्या विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते.
श्री. बगाटे म्हणाले, रत्नागिरीच्या आपल्या भाटे बीचवरून प्रथमच हाय अल्टीट्युड बलुन लाँच झाले. तुमच्या सर्वांच्या सगळ्यांच्या कार्य कुशलतेने हे झालेले आहे. आपल्यातल्याच विद्यार्थी मित्रांनी हे बनवलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं या आपल्या भूमीच्या रक्षणासाठी जहाजांचे थवे उभे केले होते. आज तुमच्यातल्याच मावळ्यांनी इथे अभ्यासपूर्वक नासामध्ये प्रशिक्षण घेऊन इस्रोमध्ये प्रशिक्षण घेऊन सॅटॅलाईट बनवलेला आहे. निश्चितपणे उद्या भारत देशाचे नाव रोशन करणार आहात. याच्याबद्दल मला तुमचा खूप अभिमान आहे.
श्री. गुप्ता, सिलिकॉन टेक हिल्स रिसर्च फाऊडेशनचे रणजीत येवले, विद्यार्थी अनशुल पाटील, शौर्य जाधव, शिवसमर्थ मुंडे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षणाधिकारी श्री. लोहार यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला विविध तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

