(रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी उतार येथे झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ५) सकाळी ६.४५ वाजता घडली.

मृत चालकाचे नाव सुभाष जगतपाल वर्मा (वय २३, रा. छतरपूर, उत्तर प्रदेश) असे असून, तो (एमएच ४६ बीबी १५३७) क्रमांकाच्या कंटेनरमधून ऑक्सिजन व हिलियम गॅस घेऊन जयगडहून मुंबईच्या दिशेने जात होता. बावनदी-सुतारवाडी येथील उतारावर भरधाव वेगामुळे त्याचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि वाहन उलटले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुभाषला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून कंटेनर बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणाची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, स्वतःच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी मृत चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

