(संगमेश्वर /एजाज पटेल)
आंबेड बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथील सुपुत्र आणि सध्या सिंधुदुर्ग पोलीस दल मध्ये कार्यरत असलेले पोलीस अंमलदार पराग प्रभाकर मोहिते (वय ३९) यांचे मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने खाकी वर्दीतील एक मनमिळाऊ, कर्तव्यनिष्ठ आणि सर्वांना आपलेसे करणारा चेहरा कायमचा हरपला आहे.
‘पराग’ या नावाचा अर्थच फुलातील परागकण नवजीवनाची बीजं पेरणारा, सुगंध आणि सृजनशीलतेचे प्रतीक. आपल्या नावाप्रमाणेच पराग मोहिते यांनी जिथे जिथे सेवा बजावली, तिथे आपुलकीचा सुगंध दरवळत ठेवला. सहकाऱ्यांशी मैत्री, नागरिकांशी जिव्हाळा आणि कर्तव्याशी निष्ठा या गुणांमुळे त्यांनी सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले.
२६ डिसेंबर २०१२ रोजी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून त्यांनी सेवेची सुरुवात केली. प्रामाणिक परिश्रम आणि शिस्तबद्ध कामगिरीमुळे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. २९ सप्टेंबर २०२० पासून ते कणकवली पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. सध्या त्यांची नेमणूक खारेपाटण पोलीस दूरक्षेत्रात होती. ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखताना त्यांनी माणुसकीची किनार कधीही सोडली नाही.
खाकी वर्दीतील त्यांचा रुबाब ठाम होता; मात्र अंत:करणाने ते अत्यंत कोमल आणि मदतीला तत्पर होते. एखाद्या गरजूला धीर देताना, नागरिकांचे प्रश्न ऐकताना किंवा सहकाऱ्यांसोबत काम करताना त्यांचा चेहरा नेहमी हसतमुख दिसायचा. त्यामुळेच त्यांच्या अचानक झालेल्या ‘एक्झिट’ने पोलीस दलात आणि परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आंबेड बुद्रुक गावात त्यांच्या निधनाची बातमी समजताच शोककळा पसरली. गावचा आधारस्तंभ, कुटुंबाचा कर्ता पुरुष आणि सर्वांचा लाडका ‘पराग’ आता परत येणार नाही, ही जाणीव असह्य ठरत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी तसेच आई-वडील असा परिवार आहे.
नावाप्रमाणेच आयुष्यभर सुगंध आणि सकारात्मकता पसरवणाऱ्या या खाकी वर्दीतील ‘परागा’ला परिसराकडून अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या आठवणींचा सुगंध मात्र कायम दरवळत राहील.

