(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील करक-पांगरी विविध कार्यकारी सोसायटीने शासनाच्या शेती कर्जमाफी योजनेत बोगस कागदपत्रे सादर करून १० लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोसायटीच्या संपूर्ण संचालक मंडळासह नऊ जणांविरोधात राजापूर पोलीस स्टेशनमध्ये काल सोमवार, दिनांक २१ एप्रिल रोजी रात्री भा.द.वी. कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घोटाळ्याची तक्रार मूळचे करक गावचे परंतु सध्या रत्नागिरी येथे स्थायिक असलेले नंदकुमार शेट्ये यांनी दाखल केली आहे. त्यांनी २०१७ ते २०२० या कालावधीतील शासकीय ऑडिट रितसर शुल्क भरून करून घेतले. सरकारी ऑडिटर, चिपळूण येथील श्री बाबासाहेब गीते यांनी केलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये अनियमितता आढळल्यानंतर श्री गीते यांनी राजापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली, ज्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीवर तीन प्रकारच्या अनियमिततेचे गुन्हे दाखल झाले आहेत. यात तक्रारदार नंदकुमार शेट्ये यांच्याकडून सोसायटीने घेतलेल्या सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या रकमेचा रजिस्टरमध्ये कोणताही उल्लेख नाही. तसेच, दोन ते तीन लोकांना नियमबाह्य कर्जमाफी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, सोसायटीच्या दैनंदिन हिशोबातही मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे.
या गुन्ह्यांतर्गत करक-पांगरी सोसायटीचे संपूर्ण संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सुरेश शांताराम बावकर, सुभाष भिकाजी यादव, विलास रघुनाथ सरफरे, विश्वास पिलाजी जाधव, जयराम तुकाराम तावडे, भारती विश्वनाथ वरेकर, अमर नारायण जाधव, भामिनी भास्कर सुतार आणि सचिव प्रशांत हरिश्चंद्र सुतार या नऊ जणांचा समावेश आहे.