(रत्नागिरी)
बावनदी येथे पोहण्यासाठी गेलेल्या हातखंबा येथील तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण हातखंबा परिसरात शोककळा पसरली आहे.
हातखंबा-सनगरेवाडी येथे राहणारे सचिन सुरेश सनगरे (वय ३५) हे आपल्या मित्र मिलिंद पांडुरंग सनगरे यांच्यासोबत दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास बावनदी येथे पोहण्यासाठी गेले होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे पोहण्याचा निर्णय घेतला असला तरी पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते. पोहत असताना सचिन पाण्याच्या खोल भागात गेले आणि अचानक बुडू लागले.
मित्रांनी व ग्रामस्थांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता सचिन यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.
सचिन सनगरे हे स्वभावाने मनमिळावू आणि कुटुंबवत्सल होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. वडील शेतकरी असून शेती हाच त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. कुटुंबाला नुकतेच घरकुल योजनेअंतर्गत घर मंजूर झाले होते. नव्या घराच्या स्वप्नांवर आनंदाची चाहूल लागत असतानाच सचिनच्या अकाली निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे हातखंबा गावात शोककळा पसरली असून नातेवाईक आणि मित्रमंडळी सनगरे कुटुंबाच्या घरी धाव घेऊन सांत्वन व्यक्त करत आहेत. तरुण वयातच काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत असून, नदी-नाल्यांमध्ये पोहताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन पोलिस तसेच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

