(संगमेश्वर / प्रतिनिधी)
मौजे कोंडीवरे (ता. संगमेश्वर) येथील कणकीचे सपाट परिसरात साबुदाणा बागेच्या कंपाऊंडला जोडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून दोन रानकुत्रे (कोळसुंदे) मृत झाल्याची घटना उघडकीस आली. दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्री. दिनेश राजाराम कदम यांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
या पाहणीदरम्यान मृत रानकुत्र्यांचे मृतदेह दिसून न आल्याने बागेची देखरेख करणाऱ्या इसमांकडे चौकशी करण्यात आली. चौकशीत दोन्ही रानकुत्रे पुरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खड्डा उकरून एक मादी व एक नर अशा दोन्ही रानकुत्र्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि पुढील तपासासाठी वनविभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन संशयित जॉर्ज पी. व्ही. (मूळ गाव : कन्नूर, केरळ) आणि घनश्याम (मूळ गाव : लखिमपूर, उत्तर प्रदेश), सध्या राहणार कोंडीवरे—यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शेती संरक्षणासाठी वापरण्यात आलेली विद्युत तार, झटका मशीन, बॅटरी, चिमटा वायर, फावडा यांसह साहित्य जप्त करून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेटे, डॉ. बेलुरे व डॉ. सोनाली शेटे यांनी मृतदेहांची तपासणी व शवविच्छेदन पूर्ण केले. संपूर्ण कारवाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी- चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत परिक्षेत्र वन अधिकारी श्री प्रकाश सुतार, वनपाल श्री सागर गोसावी (देवरुख), वनरक्षक सुरज तेली, आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे यांनी सहभाग घेतला. तर कोंडीवरेचे पोलीस पाटील राजेंद्र मेणे, दिनेश गुरव, झाकिर शेकासन, अंकित कदम, विजय कदम यांनीही सहकार्य केले.
आपल्या परिसरात वन्यजीवांशी संबंधित कोणतीही घटना आढळल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे.

