(रत्नागिरी / प्रतिनिधी)
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा देशभर संतापाची लाट उसळली असून रत्नागिरीत देखील पडसाद उमटले आहे. गुरुवारी ( दिनांक २६ डिसेंबर २०२४ ) विविध राजकीय पक्ष, आंबेडकरी संघटनांकडून विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रत्नागिरी जिल्हा समविचारी व आंबेडकरवादी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. या विराट मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चात विषयांच्या विरोधात घोषणाबाजी करून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जाहीर निदर्शने केली. त्यानंतर सहा प्रमुख मागण्यांचे निवेदन देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सादर करण्यात आले.
सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाकृत सर्वोच्च पदावरील महामहीम तथा राष्ट्रपती म्हणून आपण कार्यरत आहात. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाचा जागतिक स्तरावर सन्मान होत आहे. या भारतीय संविधानाच्या अमृतो महोत्सवी वर्षामध्ये भारतीय संसदेच्या राज्यसभा या सभागृहामध्ये भारतीय संविधानावर गौरवशाली चर्चा होत असताना दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी भारताचे गृह केंद्रीय मंत्री श्री. अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी अनुद्गार काढून घोर अपमान केला आहे. त्याचबरोबर राष्ट्राचा, राष्ट्रप्रेमी भारतीयांचा व भारतीय संविधानाचा देखील अपमान केलेला आहे. भारतीय संसदेमध्ये चर्चा करीत असताना श्री. अमित शहा यांनी जाणीव पूर्वक “आंबेडकर – आंबेडकर असे सात वेळा द्वेष भावनेन अनादर करून आंबेडकरांचे नाव घेणे ही आज काल फॅशन झाली आहे, त्या ऐवजी जर का देवाचे नाव घेतले असते तर सात वेळा स्वर्ग प्राप्त झाला असता [सात पिढ्या स्वर्गात गेल्या असत्या ]” अशा प्रकारचे मनुस्मृतीचे पुनरुज्जीवन करणारे तथा मनुस्मृतीचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केले. हा बाबासाहेबांबरोबर तमाम भारतीयांचा घोर अपमान असून हि घटना भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये काळ्या अक्षरांनी नोंदवली गेली आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, खऱ्या अर्थाने भारतीयांना समृद्ध जीवन हे भारतीय संविधानाने दिले आहे. मनुस्मृतीने भारतीयांना नरक यातना दिल्या होत्या त्यातून बाहेर काढून त्या ऐवजी संविधानाच्या पायावर समता, स्वातंत्र्य, बंधुता न्यायाच्या तत्वावर लोकशाही मुल्य जपणारी कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतून सुख समृद्धी व सर्वांग सुंदर भौतिक कल्याणकारी जीवन देणारी संविधानाची निर्मिती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत भूमीवर खरा स्वर्ग निर्माण केला. मात्र मनुस्मृतीने कपोकल्पित स्वर्गाची निर्मिती सांगितली, चातुर्वर्ण व्यवस्थेने निर्माण केलेली विषमता व त्या अनुषंगाने बहुजन समाज व अनुसूचित जाती जमाती यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अन्याय अत्याचार करून मनुस्मृती रुपी भारत निर्माण केला होता. त्यामुळे भौतिक जीवनात सर्वांग सुंदरपृथ्वी तलावरील भौतिक जीवनातील सर्वांग सुंदर जीवनाचा आनंद संविधानाने दिले आहे. असे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रमुख सहा मागण्या कोणत्या?
श्री. अमित शहा यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचारास प्रतिबंध कायद्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद देवून त्यांचेवर कठोरातील कठोर कारवाई करावीअसे आदेश देण्यात यावेत, भविष्यामध्ये श्री. अमित शहा यांना संविधानिक पद ग्रहण करत येणार नाही अशा प्रकारची कारवाई करण्यात यावी, महाराष्ट्रतील परभणी येथे संविधान शिल्पाची मोड तोड करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, महाराष्ट्रामधील परभणी येथील भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला त्यावर तेथील पोलीस प्रशासनावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा तेथील गावगुंड यांनी अमानुष मारहाण करून खून केला, या गावगुंड यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशा प्रमुख सहा मागण्यांचे निवेदन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्या मार्फत सादर करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, आरपीआय प्रदेश अध्यक्ष एल. व्ही. पवार, राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, राष्ट्रीय काँग्रेस उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा, राष्ट्रवादी कॉग्रेस-शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमोद शेरे, भारतीय बौध्द महासभा महाराष्ट्र सचिव दीपक जाधव, लांजा तालुका बौद्धजन संघाचे अध्यक्ष सुधाकर कांबळे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, भीम युवा पँथर कार्यकारणी सदस्य समीर जाधव आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.