(चिपळूण)
खेर्डी एमआयडीसी परिसरातील श्री एम पेपर मिल कंपनीला आज दुपारी अचानक भीषण आग लागली. दुपारी अवकाशात उठणारे काळ्या धुराचे प्रचंड लोट पाहून ही घटना उघडकीस आली आणि काही क्षणातच परिसरात एकच खळबळ उडाली.
पेपर मिलमध्ये मोठ्या प्रमाणात कागद आणि कच्चा माल साठवलेला असल्याने आग क्षणार्धात पसरली आणि काही मिनिटांतच तिने रौद्ररूप धारण केले. धुराचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने आग गंभीर असल्याचे स्पष्ट होत होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि कंपनी अधिकाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधला.
अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे आव्हान स्वीकारत असतानाच एमआयडीसीतील अन्य औद्योगिक युनिट्सकडून पाण्याचे टँकर आणि अतिरिक्त कर्मचारी मदतीसाठी धावून आले. कागद, पुठ्ठा आणि प्लास्टिक साहित्यामुळे आग विझवण्याची प्रक्रिया अधिक वेळखाऊ ठरत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सुदैवाने कंपनी प्रशासनाने वेळेत सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका केली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती मिळते. मात्र यंत्रसामग्री, कच्चा माल आणि इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, धुराचे लोट एमआयडीसीच्या पलीकडे जाऊन आसपासच्या गावांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांनी खबरदारी म्हणून घरे, खिडक्या आणि दारे बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे.
पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीचे कारण, नुकसानाची तीव्रता आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी याबाबत सविस्तर चौकशी सुरू आहे. संध्याकाळपर्यंतही पूर्ण आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते.

